Palkhi Yatra

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त पालखी पदयात्रेचा शुभारंभ उत्साहात संपन्न!

भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील सत्संग भवनात बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता दरवर्षीप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी पदयात्रेचा शुभारंभ उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात करण्यात आला.

आदरणीय श्री सुबोधदादा, संचालक, अड्याळ टेकडी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवलाजी मुळे गुरुजी, सुश्री रेखाताई आणि गंगाताई यांच्या प्रमुख उपस्थितीत या पालखी पदयात्रेला प्रारंभ झाला. सर्वप्रथम श्री सुबोधदादा यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर उपस्थित गुरुदेव भक्तांनी पूजन व आरती करून पालखीचे प्रस्थान केले.

चौगान व लोहारा येथील भजन मंडळांच्या भक्तिमय भजनांच्या गजरात गुरुपद गुंफेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कर्मयोगी संत पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या महासमाधीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संचालक व मार्गदर्शक श्री सुबोधदादा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ही पालखी पदयात्रा कर्मकांड किंवा अंधश्रद्धेचा भाग नसून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा, कार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारी आहे. राष्ट्रसंतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून समाजप्रबोधन, मानवसेवा आणि ग्रामविकासाची प्रेरणा देणे, हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे.

यानंतर पालखी पदयात्रेदरम्यान महिलाश्रम, शिवदासजी कोरे रसवंती, मेंढा किरमिटी, लक्ष्मणजी कोरे, किरमिटी मेंढा, सुनील भाऊ रणदिवे यांची सहारा इंडस्ट्री, श्री गुरुदेव राईस मिल, कोर्धा आणि गुरुदेव सेवा मंडळ, मिंथूर येथे भेट देऊन पूजन करण्यात आले.

दुपारी नवेगाव पांडव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी पूजन, कार्यक्रम आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ही पालखी पदयात्रा पुढील प्रवासासाठी कोटगावच्या दिशेने रवाना झाली.

या भक्तिमय पालखी पदयात्रा उत्सवामध्ये चौगान, कासर्ला, ब्रह्मपुरी, अड्याळ, मांदेड, मोखारा, चिंधी चक, लोहारा, चोरटी, पारडी, पान्होळी, लाखापूर, कोजबी, मांगरूळ, अमरावती, शेगाव (बुलढाणा), वैरागड, सुलतानपूर आदी विविध भागांतील शेकडो गुरुदेव भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर, गुरुदेव भक्तांची एकजूट आणि समाजप्रबोधनाचा संदेश घेऊन निघालेल्या या पालखी पदयात्रेमुळे परिसरात भक्तिमय व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

🙏 जय गुरुदेव! 🙏