गीताचार्य तुकारामजी दादा यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
दिनांक ८ जून रोजी, गीताचार्य तुकारामजी दादा यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त भू-वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी येथे पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गावागावांतील गीताचार्य तुकारामजी दादा यांच्या विचार व कार्याला समर्पित झालेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३.०० वाजता करण्यात आली. यावेळी श्री सुबोधदादा (संचालक, भू-वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी), भू-वैकुंठ समितीचे अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे, कार्याध्यक्ष सुश्री रेखाताई, श्री उत्तमजी पोहाणे, श्री पुरुषोत्तमजी थुटे, श्री सुखदेवजी वेठे, श्री लालचंदजी नखाते, श्री मेघेश्यामजी वैद्य तसेच पांढरवाणी येथून पालखी घेऊन आलेल्या सौ. बेबीआई काकडे व त्यांचे सहकारी यांच्यासह विविध गावांमधून आलेले गुरुदेवप्रेमी कार्यकर्ते महासमाधीस्थळावर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकांनी गीताचार्य तुकारामजी दादा यांच्या स्मृतीला अभिवादन करत त्यांच्या विचारांवर आधारित नवनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी ‘पूज्य तुकारामदादा गीताचार्य प्रतिष्ठान, नागपूर’ यांच्या सौजन्याने पुढील वर्षापासून दादांच्या कार्याचा वारसा जपत प्रत्यक्ष सेवाकार्यात योगदान देणाऱ्या उत्कृष्ट सेवकास पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा श्री पुरुषोत्तमजी थुटे यांनी केली.
यानंतर श्री सुबोधदादा यांचे समारोपीय मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पूज्य गीताचार्य तुकारामजी दादा यांना सामूहिक मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना करून सर्वांनी सामूहिक भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नवलाजी मुळे यांनी केले.









