भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथे रक्षाबंधन संकल्प सोहळा संपन्न
अड्याळ टेकडी : भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन संकल्प सोहळा श्री. सुबोध दादा, मार्गदर्शक व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
अध्यक्ष नवलाजी मुळे, कार्याध्यक्ष रेखाताई व गंगाताई यांच्या नेतृत्वात यावेळी भव्य रामधून काढण्यात आली. गुरुपद गुंफेतील पादुकांचे पूजन करून रामधून पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या महासमाधी स्थळी आली. तेथे पूज्य दादांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यानंतर संचालक श्री. सुबोध दादा यांनी उपस्थितांना उद्बोधन केले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांना ३० जुलै १९६७ रोजी आत्मानुसंधानासाठी भुवैकुंठ अड्याळ टेकडीच्या घनघोर अरण्यात १२ वर्षांसाठी मौन साधनेत बसविले. त्यानंतर ८ ऑगस्ट १९६८ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुंबई रुग्णालयात भरती असताना अड्याळ टेकडीवरून पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांना बोलावून घेतले.
सर्व कार्यकर्त्यांसमक्ष, “मी तुम्हाला आज गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञानाची जबाबदारी सोपवित आहे,” असे म्हणून वंदनीय महाराजांनी पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या हाताला राखी बांधली.
तेव्हापासून भुवैकुंठ अड्याळ टेकडीवरील रक्षाबंधन महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी पंचक्रोशीतील अनेक गुरुदेव भक्त अड्याळ टेकडीवर येऊन येथील सेवकांना सेवामंडळाच्या कार्याची राखी बांधतात आणि पुढील कार्यासाठी येथून मार्गदर्शन घेऊन जातात.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या कटकारस्थानामुळे सध्या अड्याळ टेकडी येथील जाहीर सार्वजनिक कार्यक्रम अगदीच सौम्य पद्धतीने व थोडक्यात संपन्न होत असले तरी, रामधूननंतर दिवसभर अड्याळ टेकडीवर सातत्याने येणारा गुरुदेव भक्तांचा जथ्था मात्र अड्याळ टेकडीवरील गावातील सर्वसाधारण सेवकांच्या श्रद्धा, प्रेम, आपुलकी व निष्ठेला इंगित करणारा होता.
“आती रहे हवा भली,
दुनिया में जोर की |
छोड़ेंगे नही कामना,
प्यारे किशोर की ||”
याप्रमाणे अड्याळ टेकडीवरील श्रमदान असो, कार्यक्रम असो किंवा अन्यायाच्या विरुद्ध आंदोलन, धरणे अथवा मोर्चे असोत, पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांचे भक्त सदैव तन-मन-धनाने तयार असतात.
भुवैकुंठ अड्याळ टेकडी येथील लोकशाहीचा वस्तुपाठ आजच्या गाव-समाजासाठी एक आदर्श नमुना आहे. तसेच रक्षाबंधन म्हणजे केवळ बहिण-भावाचा सण-उत्सव नसून, ती एक जबाबदारीची जाणीव आणि कशाच्या तरी रक्षणाचे बंधन आहे, ही नवीन शिकवण अड्याळ टेकडीच्या माध्यमातून समाजाला मिळत असते.

विविध गावांतून हजारोंच्या संख्येने आलेल्या गुरुदेव भक्तांचा दिवसभर अड्याळ टेकडीवर वावर होता. सुबोध दादा, नवलाजी मुळे, रेखाताई यांच्यासोबत चर्चा, शंका-समाधान, गावकार्याचे नियोजन, तसेच दर्शन व महाप्रसाद घेऊन परत जाणे, असा क्रम दिवसभर सुरू होता.
अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात रक्षाबंधन संकल्प सोहळा संपन्न झाला.







