ग्रामगीतेतून ग्रामराज्याकडे : मोखारा ग्रामनिर्माण सप्ताहाने घडवलेली परिवर्तनाची क्रांती
🪔 नवक्रांतीची मशाल
ग्रामनिर्माण सप्ताह – मोखारा
परिवर्तनाचा एक अदभुत नमुना
कीर्तन, उत्सव, प्रवचन |
नुसते नसावे मनोरंजन |
गावकऱ्यांचे उजळेल जीवन |
ऐसे कार्यक्रम करावे || ग्रामगीता ||
या राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमाणे आणि “कर्म हिच पूजा मोठी” या पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या तत्वाप्रमाणे ग्राम मोखारा, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे श्री सुबोध दादा संचालक भू वैकुंठ अड्याळ टेकडी यांच्या मार्गदर्शन मध्ये ग्रामनिर्माण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोखारा चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री लालचंदजी नखाते यांची प्रेरणा सातत्याने प्रज्वलित असते.
ग्रामनिर्माण सप्ताहाची सुरुवात
गेल्या काही वर्षापासून मोखारा ग्रामवासी यांनी ग्रामगीता प्रणित ग्रामनिर्माण सप्ताह निमित्त त्यांच्याच गावातील स्मशानभूमी मध्ये श्रमदान सुरू केले. त्यामुळे दोन माणूस खोल खड्डे समांतर करून त्या मैदानावर क्रमवार फूल झाड, फळ झाड, भाजीपाला, दाहसंस्कार इमारतीची पेंटिंग, अंत्य संस्कार सुविचार फलक, रस्ता, सभागृह, पुस्तके, भव्य महादेव मूर्ती स्थापना, बगीचा, बैठक व्यवस्था, भव्य प्रवेशद्वार इत्यादी गोष्टीं निर्माण होऊन त्याचे रूपांतर नंदनवन म्हणून प्रसिद्धीस आले. पंचक्रोशीतील सर्व गावांचे ते एक आकर्षणाचे केंद्र ठरले.
आदर्श दिनचर्या – शिस्त आणि श्रमदान
सप्ताहाच्या नियमाप्रमाणे मोखारा ग्रामवासी सकाळी सामुदायिक ध्यान, व्यायाम योग प्राणायाम, कर्मकांड विरहित शिस्तबद्ध रामधून, चार तासाचे श्रमदान, श्रमदान स्थळीच नाश्ता, श्रमदान नंतर आपल्या घराचे डब्बे एकत्र आणून सेवा मंडळ मध्ये सामूहिक शिदोरी पद्धतीने सहभोजन, दुपारी व्यक्तिगत कामे, सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, त्यानंतर अड्याळ टेकडी च्या मार्गदर्शनात ग्रामगीता प्रबोधन, रात्री भोजन व विश्राम अशी आदर्श दिनचर्या पालन करतात.
स्मशानभूमी ते नंदनवन
त्यामुळे त्यांच्या भग्न अवस्थेतील स्मशानभूमी नंदनवन झाली, रस्ते नाल्या साफ झाल्या. त्यानंतर मोखारा ग्रामवासी यांनी असा संकल्प केला की आपण सात दिवस लगतच्या गावात जाऊन श्रमदान करायचे. तेव्हापासून आपल्या व्यवस्थेने जवळच्या ग्रामात जाऊन त्यांच्यासोबत श्रमदान करणे आणि परत येणे. त्या गावांवर एक रुपयाचा खर्च न पडू देता आपले सेवा देऊन परत येणे.
याला म्हणतात –
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा
याप्रकारे या गावाने आतापर्यंत तब्बल २५ गावात सामूहिक श्रमदान ची सेवा दिली. त्यामुळे इतर गावातील लोकांनी सुद्धा त्यांच्या गावातील स्मशानभूमी नंदनवन करण्याच्या संकल्प केला आहे.
परिवर्तनाची खरी क्रांती
ज्यासी वाटे जनसेवा करावी,
त्याने आधी लोकलाज सोडावी || ग्रामगीता ||
याप्रमाणे येथे आजच्या काळात लोक आपल्या घरातील कामासाठी कचरतात, स्वतःच्या गावातील श्रमदान साठी लागतात तेथे ही मोखारावासी दुसऱ्यांच्या गावात जाऊन श्रमदान करतात. यालाच परिवर्तनाची क्रांती म्हणतात आणि त्यासाठीच सेवा मंडळ ची निर्मितीही आहे, असे आम्हाला वाटते.
स्वावलंबनातून स्वराज्याकडे
ग्रामराज्याची रामराज्य
स्वावलंबन हेचि स्वराज्य
याप्रमाणे स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पूजेसाठी हार, माथ्यावर कुंकू, धूपबत्ती, पंचगव्य चिकित्सा व निसर्गोपचार इत्यादी गोष्टी गावातच आपल्या स्वकलेतून स्वावलंबी पद्धतीने साकार केल्या जातात.
श्रमदानाची रामधून
डोक्यावर टोपली, हातात फावडे
मुखात नामघोष, दिवसी आवडे
याप्रमाणे प्रत्यक्ष डोक्यावर टोपले, फावडे व श्रमदान साहित्य घेऊन रामधून काढण्यात येते आणि ती रामधून सरळ श्रमदान स्थळी समाप्त होऊन तेथेच श्रमदान कार्यक्रम सुरू होतात.
या उपक्रमात डॉ. नवलाजी मुळे, सुश्री रेखाताई, सुश्री गंगाताई, इत्यादी आजीवन सेवाभावी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन होत असते.
उत्सव असो वा जयंतीदिन,
सांगता यावे त्याचे कारण,
उगीच लाडू पेढे खावया जयंतीदिन,
पाळू नये || ग्रामगीता ||
याप्रमाणे साधा पालपेंडाल, साधे सेवाभावी मार्गदर्शक वक्ते, साधा कार्यक्रम, कर्मकांड अवडंबर दिखावा काही नाही, लाख रुपयांचे कोणते महाराज नाही, सप्ताह साठी घराघरातून वर्गणी जमा करत नाही, स्वप्रेरणेने जो जे देईल त्यात कार्य संपन्न करणे, शेवटी महाप्रसादात हजारो लोकांना साखर वजा करून गुळाचे पदार्थ खाऊ घालणं आणि या संपूर्ण सप्ताहाचा एकंदरीत खर्च केवळ 40 हजारात पूर्ण करून गावात लाखो रुपयांचे श्रमदान कार्य साकार करणे, यासाठी मोखारा गावातील सप्ताह विशेष आहे.
आपण सुद्धा यापासून प्रेरणा घेऊन आपल्या ग्रामात आपले नंदनवन, स्वराज्य व भू वैकुंठ निर्माण करावे. ही विनंती.
आभार, जय गुरु 🙏


















