कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य जयंती निमित्त वेब साईट चे उद्घाटन
दिनांक ०१ डिसेंबर २०२५, सोमवार रोजी गीताजयंती व कर्मयोगी संत प. पु. तुकारामदादा गीताचार्य यांची १११ वी जयंती भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे आ. श्री. सुबोधदादा (मार्गदर्शक व संचालक, भु-वैकुंठ अड्याळ टेकडी) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
दुपारी ०१ वाजता सत्संग भवन येथून भव्य रामधून काढण्यात आली. गुरुपद गुंफा चरण पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर प. पु. तुकाराम दादा गीताचार्य यांच्या समाधीचे पूजन करून संकल्परूपी कार्यक्रमास सुरुवात झाली.
या निमित्ताने अड्याळ टेकडीच्या जागतिक प्रचारासाठी आज https://gramgita.com ही नवी वेब साईट प्रकाशित करण्यात आली.
प्रास्ताविकात डॉ. नवलाजी मुळे (अध्यक्ष, अड्याळ टेकडी) यांनी गीताजयंतीचे महत्त्व स्पष्ट केले. श्रीमती उषाताई नारखेडे यांनी सर्वांना तन-मन-धन व श्रमदान करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. सुश्री रेखाताई यांनी प्राप्त परिस्थितीत कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.
समारोपीय मार्गदर्शनात श्री. सुबोधदादा यांनी सांगितले की, अड्याळ टेकडी ही स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णता या तत्त्वांवर, तसेच आत्मशक्ती व जनशक्तीच्या आधारावर कार्य करणारा ग्रामगीताप्रणित, लोकशाही आणि ग्रामस्वराज्याचा आदर्श प्रयोग आहे. म्हणूनच पु. दादांनी हा प्रयोग सरकारी खात्यात नोंदणीकृत (रजिस्टर) केलेला नाही.
अड्याळ टेकडीवर लोकसहकार्याद्वारे मौन साधना, अध्यात्म गुरुकुल, शेती, गोरक्षण, महिला सक्षमीकरण, योग-निसर्गोपचार, पंचगव्य चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, युवकांसाठी जीवन शिक्षण शिबिरे, ग्रंथसाहित्य प्रकाशन, ग्रामनिर्माण सप्ताह, पंचायत राज व ग्रामसभा प्रशिक्षण अशा विविध प्रयोगांचे कार्य सातत्याने सुरू आहे.
हा एक अभिनव व अद्वितीय प्रयोग असल्याने विविध प्रांत व राज्यांतील लोक मोठ्या प्रमाणात येथे जुळत आहेत. या प्रयोगाचा लाभ जगभरातील लोकांना मिळावा म्हणून पु. तुकारामदादा गीताचार्य जयंती निमित्त अड्याळ टेकडीवरून https://gramgita.com ही वेबसाईट प्रक्षेपित करण्यात आली. यामुळे अड्याळ टेकडीचे तत्त्वज्ञान आणि येथील सर्व कार्य-प्रयोग जगभर सहज उपलब्ध होणार आहेत.
ही वेबसाईट पुणे येथील डॉ. मनीष नारखेडे व डॉ. महेश कोलते यांच्या सहयोगातून निर्माण झाली. प्रसंगी सर्व गुरुदेव भक्तांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत व अभिनंदन केले.
जागतिक प्रचार-प्रसार प्रकाशन विभागाच्या या उपक्रमासाठी गुरुदेव भक्तांनी विविध आर्थिक संकल्प दान करून पु. दादांची संकल्परूपी जयंती साजरी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्री रेखाताई यांनी केले. कार्यक्रमाला श्री. किशोर भाऊ तिडके, श्री. लालचंदजी नखाते, श्री. मारोतीजी साव, विजयजी देरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी शांतिपाठ व जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.









