भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे महिला संमेलन उत्साहात संपन्न
अड्याळ टेकडी (दि. १५ मार्च २०२६): भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित महिला कार्यकर्ता संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनात चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतील विविध गावांमधून शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे नियोजन सुश्री रेखाताई (कार्याध्यक्ष, अड्याळ टेकडी) यांनी केले होते, तर प्रास्ताविक गंगाताई काकडे यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती उषालाई किनगे उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुबोधदादा (संचालक, भू-वैकुंठ अड्याळ टेकडी) यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डॉ. नवलाजी मुळे (अध्यक्ष, भू वैकुंठ अड्याळ टेकडी) तसेच माधुरीताई नखाते यांनी महिला सक्षमीकरण, ग्रामसभा आणि आरोग्य या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. आ. बेबीताई काकडे यांनी व्यसनमुक्ती निर्मूलन या विषयावर प्रभावी विचार मांडले.
संमेलनात आरोग्य, शिक्षण, संघटन, व्यसनमुक्ती, स्वयंपाकशास्त्र, गर्भसंस्कार आणि ग्रामसभा अशा विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. विविध गावांतील महिलांनी आपले कार्य अहवाल सादर करून अनुभवांची देवाणघेवाण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आरती आणि पुजा यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मीताई गुरुनूले यांनी केले. शेवटी राष्ट्रवंदना व प्रमाणपत्र वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे संमेलन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरले असून, ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांना प्रेरणा देणारे ठरले.






