भु-वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी येथे गुढीपाडवा उत्सव संपन्न
श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडीच्या पंचमोत्सवापैकी मोठा महोत्सव म्हणजेच गुढीपाडवा हा पुज्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या पावन तपोभूमीत दि. १९ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सुबोध दादा, मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकडी, तसेच प्रमुख उपस्थितीत डॉ. नवलाजी मुळे (अध्यक्ष, अड्याळ टेकडी), सुश्री रेखाताई, श्री. किशोरजी तिडके (पोलीस पाटील), श्री. दिलीपजी भोयर (गडचिरोली), लालचंदजी नखाते (मोखारा) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सत्संग भवनातून प्रदक्षिणा काढून गुरुपद गुंफा येथे पूजन व आरती करून झाली. त्यानंतर महासमाधी येथे सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी रामधून काढली. महासमाधीवर मार्गदर्शन करण्यात येऊन रामधुनीचा समारोप करण्यात आला.
प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. नवलाजी मुळे यांनी प्रास्ताविकामध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व विशद केले. सुश्री रेखाताई (महिला प्रमुख) यांनी अड्याळ टेकडीच्या चालू घडामोडींवर मार्गदर्शन केले. श्री. सुबोध दादा यांनी आपल्या मार्गदर्शनात गुढीपाडव्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व, अड्याळ टेकडी निर्मितीचे तत्त्वज्ञान आणि “कार्यक्रमापेक्षा कार्य हिच खरी पूजा” या पुज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या मूलमंत्रानुसार पुढील ग्रामजयंतीचा कार्यक्रम कमीत कमी खर्चात व जास्तीत जास्त सक्रियतेने कसा साजरा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर ग्रामजयंती निमित्त विविध भागात गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच ग्रामगीता लवकरच तेलगू भाषेत छपाई करण्याचे घोषित करण्यात आले. यावेळी गुरुदेव भक्तांनी या कार्यासाठी तसेच प्रकाशन मंडळासाठी आर्थिक सहकार्य जाहीर केले.
येथे संकल्प घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले संकल्प पूर्ण केले. मांदेड येथील श्रमदानी मंडळीने भोजन बनविण्याची सेवा दिल्याबद्दल श्री. सुबोध दादांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्री गंगाताई यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शांतीपाठ व जयघोष करून सर्वांना भोजनगृहात महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.









