भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे राष्ट्रीय योग निसर्गोपचार शिबिर व संमेलन संपन्न
अड्याळ टेकडी : येथील भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी आणि अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत ‘३ दिवसीय राष्ट्रीय स्वावलंबी योग निसर्गोपचार आणि साधना शिबीर’ अत्यंत उत्साहात पार पडले.
शिबिराचा शुभारंभ ६ मार्च रोजी संचालक श्री सुबोध दादा यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी डॉ. धनलाल शेंद्रे, डॉ. प्रमोद माळवे, डॉ. नवलाजी मुळे आणि सुश्री रेखाताई (कार्याध्यक्ष, अड्याळ टेकडी) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी तुकाराम दादा यांच्या प्रतिमांचे दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी आरोग्य प्राप्तीसाठी योग आणि निसर्गोपचाराची अपरिहार्यता स्पष्ट केली. त्यानंतर सर्व शिबिरार्थींच्या परिचयानंतर आयोजित सामुदायिक प्रार्थना सत्रात अड्याळ टेकडीचे संचालक आदरणीय सुबोध दादा यांनी ब्रह्ममुहूर्त, प्राकृतिक चिकित्सेचे केंद्र म्हणजे गाव तसेच राष्ट्रसंतांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथातील विचारांवर सर्वकष मार्गदर्शन केले. त्यांनी अड्याळ टेकडीच्या कार्याची संक्षिप्त माहिती देऊन उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ब्रह्ममुहूर्तावरील सामुदायिक ध्यान आणि सूर्यदर्शनाने झाली. या सत्रात योगगुरू पंकज शुक्ला यांनी विविध योगासनांचे प्रशिक्षण देत व्याधी निवारणात योगाचे फायदे पटवून दिले. त्यानंतर निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. धनलाल शेंद्रे, डॉ. प्रमोद मालवी आणि डॉ. नारायण अंभोरे यांच्या उपस्थितीत नेती क्रिया, कुंजल क्रिया आणि धौती क्रिया यांसारख्या शुद्धीक्रियांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पार पडले. या तज्ज्ञांनी आपापल्या विषयावर सखोल मार्गदर्शन करत शिबिरार्थींच्या शंकांचे निरसन केले.
८ मार्च रोजी सकाळी ग्राम प्रदक्षिणा आणि रामधून रॅली काढून ग्रामस्थांमध्ये निसर्गोपचाराबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीनंतर सर्व शिबिरार्थींनी नैसर्गिक ‘मड बाथ’ (मृदा स्नान) चा अनुभव घेतला.
शिबिराचा समारोप जागतिक महिला दिन आणि समारोपीय कार्यक्रमाच्या संयुक्त आयोजनाने झाला. यावेळी सुबोध दादा यांनी ग्रामगीतेच्या आधारे नारीशक्तीचे ऐतिहासिक व वर्तमानकालीन महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई यांनी महिला संघटन आणि सक्षमीकरणावर भर देत ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेचा तात्विक दृष्ट्या सविस्तर विस्तार केला.
समारोपीय सत्रात डॉ. शेंद्रे सर, डॉ. प्रमोद माळवे सर, डॉ. रमेश खोब्रागडे सर आणि डॉ. नवलजी मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व निसर्गोपचार तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अशा प्रकारे या ३ दिवसांच्या शिबिरातून स्वावलंबन आणि नैसर्गिक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
सदर शिबिरात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अमरावती, नांदेड, संभाजी नगर, पुणे, मुंबई तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगढ, उडिसा आणि कलकत्ता (पश्चिम बंगाल) या प्रांतांतून १२५ प्रेमी सेवकांनी सहभाग घेतला.









