Manavta Din

अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देत गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक श्री. बाळकृष्ण हांडे यांचा ८२ वा जन्मदिन सोहळा संपन्न

वर्धा जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक श्री. बाळकृष्ण हांडे यांचा ८२ वा जन्मदिन सोहळा अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देणाऱ्या व समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या उपक्रमांतर्गत संपन्न झाला. हा कार्यक्रम श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री सुबोधदादा (संचालक, भू-वैकुंठ अड्याळ टेकडी), मोहनजी राऊत, वागदरकर काका, घोडे महाराज, बेलखोडे साहेब आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांनुसार, मृत्यूनंतर होणाऱ्या खर्चिक व अनिष्ट रूढींना विरोध दर्शवत “मरणोत्तर तेरावीचा कार्यक्रम होऊ नये” या संकल्पनेची अंमलबजावणी श्री. हांडे यांनी आपल्या हयातीतच प्रत्यक्ष कृतीतून केली. यानिमित्ताने त्यांनी स्वखर्चाने गुरुदेव सेवा मंडळातील सेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण सादर केले.

या प्रसंगी विदर्भ, महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथून गुरुदेव सेवा मंडळासाठी सेवाभावाने कार्यरत असलेल्या निवडक आजीवन व जबाबदारीपूर्ण सेवकांचा सन्मान करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात सुश्री रेखाताई (कार्याध्यक्ष, अड्याळ टेकडी), ज्योत्स्नाताई पात्रीकर (प्रचारिका, मध्यप्रदेश), श्री सुरेशभाऊ देसाई (देहू–पुणे), श्री तुषार सूर्यवंशी (प्रबोधनकार), श्री मोहनभाऊ चोरे, सौ. निर्मलाताई खडतकर, सौ. वृषालीताई धर्मपुरीवार यांच्यासह एकूण २१ प्रचारकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सत्कारासोबतच संबंधित सेवकांना प्रवास खर्चाची मदत देखील देण्यात आली.

या कार्यक्रमास परिसरातील शेकडो गुरुदेव भक्तांची उपस्थिती लाभली. सत्कारानंतर सत्कारमूर्ती व उपस्थित मान्यवरांनी आपल्या अनुभवांद्वारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सर्व उपस्थितांनी ज्येष्ठ प्रचारक श्री. बाळकृष्ण हांडे यांना त्यांच्या ८२ व्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत, त्यांच्या दीर्घकालीन प्रचारकार्याचा गौरव केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना व महाप्रसादाने करण्यात आली.