Purgrast Sahkarya Mohim

आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी संस्थान तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शाळांना सहकार्य

सप्टेंबर 2025 रोजी पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी होऊन शेकडो वर्षांचा रेकॉर्ड तोडणाऱ्या मुसळधार पावसाने या भागात महापुराचा तांडव केला. अनेक गावांमध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आणि विशेषतः शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

“आग लागणे, विहिरीत पडणे
कॉलरा होणे, मूर्च्छा येणे
प्रत्येक प्रसंगी धावून जाणे कर्तव्य त्यांचे”

ग्रामगीता

या महाराजांच्या उपदेशाप्रमाणे, कोरोना काळात भंडारा–चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथून सहकार्य मोहीम राबविण्यात आली होती. त्याच आदर्शाला पुढे नेत, सन 2025 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित पालखी पदयात्रा शुभारंभ सोहळ्यात पूरग्रस्त भागातील आपत्कालीन प्रकल्पांना सहकार्य करण्याचा संकल्प गुरुदेव भक्तांनी केला.

या उपक्रमासाठी पालखी दरम्यान गुरुदेव भक्तांकडून ₹55,000 जमा झाले. त्यानंतर इच्छुक सेवकांच्या सहकार्याने एकूण ₹1,00,000 इतकी रक्कम संकलित करण्यात आली.

धाराशिव तालुक्यातील परांडा येथील ह.भ.प. श्री घोगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त शाळांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये:

  • माणिकबाबा उच्च माध्यमिक शाळा, शेळगाव (धाराशिव जिल्हा) – सुमारे 450 विद्यार्थी
  • नवभारत विद्यालय, दारफळ (सोलापूर जिल्हा) – सुमारे 500 विद्यार्थी

या दोन्ही शाळांमध्ये पूरामुळे इमारत, अलमारी, डेस्क-बेंच, वर्गखोल्या, संडास-बाथरूम इत्यादी सर्व सुविधा अक्षरशः पूर्णतः निस्तनाबूत झाल्या होत्या. त्यामुळे या शाळांची निवड मदतीसाठी करण्यात आली.

दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी
श्री सुबोध दादा (संचालक व मार्गदर्शक, भू वैकुंठ अड्याळ टेकडी),
सौ. रेखाताई (कार्याध्यक्ष, अड्याळ टेकडी),
श्री सुभाष मेश्राम (व्यवस्थापन, अड्याळ टेकडी),
श्री राजेंद्र भाऊ राऊत (ज्येष्ठ कार्यकर्ते, अड्याळ टेकडी)

यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन पूरपीडितांची दुर्दशा पाहिली. विद्यार्थ्यांना ग्रामगीता – सेवा धर्म या विषयावर मार्गदर्शन केले, राष्ट्रसंतांचे साहित्य भेट दिले आणि दोन्ही शाळांना प्रत्येकी ₹50,000 अशी आर्थिक मदत सुपूर्त केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ध्यान-प्रार्थना, भजन-किर्तन यांसोबतच पूर, भूकंप, आग अशा आपत्कालीन परिस्थितीत सेवामंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मदत केली. भारत–चीन युद्धाच्या वेळीही गावोगावातून सोने, चांदी व पैशांची मदत देशासाठी पाठविण्यात आली होती.

अशा प्रकारे राष्ट्रसंतांच्या
“देशभक्ती हिच देवभक्ती”
या उक्तीला साकार करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न भू वैकुंठ अड्याळ टेकडी संस्थान तर्फे करण्यात आला.

जय गुरु! जय हिंद!!